
सामना प्रतिनिधी। मुंबई
महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या समाजातील विविध संघटनांकडून केला जात आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड शिवसेनेच्या माध्यमातून गोर बंजारा जमातीचे प्रलंबित प्रश्न सरकारदरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या समाजाला शिवसेना नक्कीच न्याय मिळवून देईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले.
बंजारा जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, नॉनक्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे आदी प्रलंबित मागण्यांबाबत बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीस शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड, अमरसिंग लिलावत, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री के. जगन्नाथराव यांच्यासह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मागण्यांवर झाली चर्चा
गोर बंजारा जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, नॉनक्रिमिलेअरची जाचक अट रद्द करा, गोर बंजारा समाजात घुसखोरी करणाऱयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करा, ऊसतोड भूमीहीन कामगारांना वनजमीन देणे, तांडय़ाच्या जागा नावावर करणे, तांडय़ात ग्रामपंचायत स्थापन करणे, महामंडळ सक्षम करणे, विद्यार्थ्यांना वसतिगृह, परदेशी शिक्षण व शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध करून देणे, सार्थी-बार्टीच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी संस्था, राज्याच्या सांस्कृतिक धोरणात गोर बंजारा लोककलांचा समावेश करून गोर बंजारा अकादमी स्थापन करणे.

























































