अनिल बिलावा चॅम्पियन, नवोदित ‘मुंबई श्री’च्या जेतेपदावर मोहोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anil-bilava

क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

परळ येथील हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावा याने नवोदित ‘मुंबई श्री’ ही मुंबईतील मानाची स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली. तो आधी कधीच शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला नव्हता… त्याच्याकडे पोझ मारण्याचाही अनुभव नव्हता… त्याचे नावही कुणाच्या परिचयाचे नव्हते… तोसुद्धा फारसा कुणाला ओळखत नव्हता… पण मुंबई शरीरसौष्ठवाची बालवाडी असलेल्या नवोदित ‘मुंबई श्री’ च्या मंचावर तो आला आणि त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी मानाच्या असलेल्या किताबावर आपले नाव कोरले.

क्रीडाप्रेमी शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांच्या पुढाकारामुळे सभागृहात रंगणाऱया नवोदित ‘मुंबई श्री’ला गोरेगाव पूर्वेच्या पांडुरंग वाडीचे मैदान लाभले. शिवसेना शाखा क्र. 51 आणि युवा शक्ती मित्र मंडळाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या दिमाखदार स्पर्धेने साऱयांचीच मने जिंकली. स्पर्धेच्या भव्यदिव्य आयोजनासाठी मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय (नंदू) खानविलकर, अमोल कीर्तिकर, सरचिटणीस राजेश सावंत आणि सुनील शेगडे यांनी अथक परिश्रम केले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आमदार सुनील प्रभू, आमदार मंगेश कुडाळकर, माजी नगरसेविका वर्षा टेंबवलकर, युवा शक्तीचे अमित ठाकूर, छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार विजेते मधुकर थोरात, प्रवीण सकपाळ, किरण पाटील, राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, कार्यकारी संचालक मदन कडू, सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे आणि नगरसेवक आयोजक स्वप्नील टेंबवलकर यांच्या उपस्थितीत पार पडला.