एमटीएचएलच्या उद्घाटनाला आता 12 जानेवारीचा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलाचे 98 टक्के काम पूर्ण आणि प्रवासासाठी 500 रुपये टोलचा प्रस्ताव

देशातील सर्वात मोठा सागरी पूल म्हणून ओळखला जाणाऱया शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण या पुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘डेट’ मिळत नसल्याने लोकार्पण सोहळा रखडला आहे. मात्र 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना मुंबईत आमंत्रित करून पुलाचे लोकार्पण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते.

या पुलामुळे मुंबईतून रायगड जिह्यात वीस मिनिटांत पोहोचता येईल. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान दीड तासाचा कालावधी लागतो. या पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याची योजना आहे. त्यामुळे पुलाचे लोकार्पण रखडले आहे.

‘एमटीएचएल’ पुलामुळे मुंबई, नवी मुंबई आणि नवी मुंबईचा नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे वेळ व इंधनात मोठी बचत होणार आहे. परिणामी या पुलावर 500 रुपये टोल आकारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने सादर केल्याचे समजते. टोलच्या रकमेवरून प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे.

राममंदिरापूर्वी एमटीएचएलचे लोकार्पण

स्वामी विवेकानंद यांचा 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. त्याच कार्यक्रमाला जोडून ‘एमटीएचएल’चे उद्घाटन करून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. कारण जानेवारीच्या तिसऱया आठवडय़ानंतर पंतप्रधान मोदींसह सर्व नेते अयोध्येत राममंदिराच्या कार्यक्रमात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच ‘एमटीएचएल’चे लोकार्पण करून घेण्याचा घाट रचला जात आहे.