
अभियांत्रिकी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करून तीन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही. त्यातच पुनर्मूल्यांकनाचा निकाल बाकी असताना मुंबई विद्यापीठाकडून एटीकेटीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी पेचात सापडले आहेत. एटीकेटीची परीक्षा द्यायची की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सत्र आठची परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून जूनमध्ये घेऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी पुनर्मूल्यांकन व एटीकेटीची परीक्षा देण्याचा पर्याय असतो. त्यानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एटीकेटीबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. पुनर्मूल्यांकनाच्या अर्जावर विद्यार्थ्यांना तातडीने उत्तर मिळणे अपेक्षित असते. त्यानुसार विद्यार्थ्यांना एटीकेटी परीक्षा देण्याचा निर्णय घेता येतो, मात्र अर्ज करून तीन महिने उलटले तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर केलेला नाही. त्यातच एटीकेटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा सोमवारपासून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची काsंडी झाली असून पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची वाट पाहायची की एटीकेटीची परीक्षा द्यायची या पेचात विद्यार्थी आहेत.
– विद्यार्थी एटीकेटीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास आणि त्यानंतर पुनर्म्ल्यांकनाचा निकालात उत्तीर्ण झाल्यास तो विद्यार्थी अनुत्तीर्णच समजला जातो. त्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने विद्यापीठाकडे धाव घेतली आहे. तेथील अधिकाऱयांकडून त्यांचे गुण व निकाल तोंडी सांगण्यात येत आहेत. तसेच जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना परीक्षेला बसू नका, असे नियमबाह्य पद्धतीने सांगण्यात येत आहे. विद्यापीठाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली आहे. याची दखल घेत युवासेनेचे माजी सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डी. टी. शिर्पे यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने त्यांचे गुण व निकाल सांगितला जात आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन निकालास विलंब का करत आहे? निकाल जाहीर न करता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सांगून त्यांची दिशाभूल करण्याचे काम विद्यापीठाकडून केले जात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱयांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
n अॅड. वैभव थोरात, माजी सिनेट सदस्य, युवासेना





























































