तलाव 94 टक्के भरले तरी… पुढील वर्षी पाणीपुरवठ्याचे मोठे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील तलावांमध्ये सध्या 94 टक्के पाणीसाठा असला तरी भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. 2027 मध्ये पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तलावातील दहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवायचा की नाही, याबाबत सरकारशी चर्चा करून प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच दहा टक्के पाणीकपात ठेवायची की नाही, यासाठी सरकारशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

पालिकेच्या स्थायी समिती सदस्य आणि पत्रकारांनी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा बुधवारी दौरा केला. यावेळी महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सभागृह नेते गणेश खणकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी, एमआयएमचे गटनेते विजय उबाळे, शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर यांच्यासह अनेक स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी मुंबईत सद्यस्थितीत सुमारे 2200 इमारतींचे बांधकाम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे मनोरंजन क्लब, जलतरण तलाव तसेच बांधकामांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मुंबईकरांना पिण्याचे पाणी पोहोचवणे प्रथम प्राधान्य असून अन्य बाबी दुय्यम स्तरावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

34 टक्के हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले. शिवाय, विहिरी पुनर्जीवित करण्यावर भर देण्यात येणार असून मोटारीद्वारे पाणी उपसा करणाऱ्यांवर बंधन आणण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील विहिरी आणि बोअरवेलवर आरओ प्लांट टाकून पाणीपुरवठा करता येईल का, याचा विचार सुरू असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे – किशोरी पेडणेकर

मुंबईसाठी पाण्याचे नियोजन नीट करावे लागेल. बाष्पीभवन जास्त होत असल्यामुळे आणि अल निनोचा दुष्परिणाम पाहता खबरदारी आवश्यक आहे. तलावांतील गाळ काढण्यासारख्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.