शिवसेनेमुळे पालिकेचा आता वृद्धांनाही ‘आधार’! गोरेगावमध्ये पहिल्यांदाच नऊ मजली वृद्धाश्रम, मेडिकलसह मनोरंजनाच्या सोयीसुविधा

मुंबईकरांना अनेक नागरी सुविधा देणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे आता वृद्धांनाही ‘आधार’ मिळणार आहे. वृद्धांसाठी पालिका गोरेगाव पूर्व येथे तळमजला अधिक नऊ मजली अद्ययावत सुविधा असणारी इमारत बांधणार आहे. यासाठी पालिका 13 कोटी 38 लाख 95 हजार रुपये खर्च करणार आहे. पालिका वृद्धांसाठी पहिल्यांदाच वृद्धाश्रम उभारत आहे. शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माजी नगरसेविका साधना माने यांनी यासाठी पाठपुरावा केला.

एक कोटी 30 लाख लोकसंख्या असणाऱ्या मुंबईत ज्येष्ठांची संख्याही मोठी आहे. यातील अनेकांना आधाराचीही गरज असते.  या पार्श्वभूमीवर पालिकेने गरजू वृद्धांना आधार देण्यासाठी गोरेगाव पूर्व येथील रहेजा रिजवुडजवळील श्रीराम मंदिर रोड, जयकोच गोरेगाव पूर्व येथे 5 टक्के आरक्षित भूखंडावर वृद्धाश्रमासाठी तळमजला अधिक 9 मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही इमारत 602 .00 चौरस मीटर परिसरात  बांधण्यात येणार आहे. या वृद्धाश्रमाच्या जागा आरक्षणासाठी, बांधकामाचे आदेश मिळेपर्यंत शिवसेनेच्या माजी नगरसेविका साधना माने यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच  रहेजा इमारतीच्या बाजूला,  लोटस पार्कसमोरील मोकळ्या जागेत ही प्रशस्त इमारत उभी राहणार आहे. या  वृद्धाश्रमाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, शाखाप्रमुख अजित भोगले यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

अशा असणार सोयी

तळमजल्यावर प्रथमोचार केंद्र , औषधालय, प्रशासकीय खोली

पहिला मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग, पाळणाघर व मानसोपचार पेंद्र

दुसरा मजल्यावर स्वयंपाकघर, जेवणाची खोली, अन्नधान्य साठवण्याची खोली, कपडे धुण्यासाठी खोली

तिसरा ते आठव्या मजल्यावर डबल व सिंगल बेड्सची खोली

नवव्या मजल्यावर सिंगल बेड्स व मनोरंजन खोली, मेडिकल स्टोअर्स, उपाहारगृह, ओपीडी.

82 बेडची सुविधा

– या वृद्धाश्रमासाठी मेडिकल तपासणी, मनोरंजन, 24 तास पाणी, वॉरट कुलरसह विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

– सिंगल रूम, डबल रूम असे 82 बेड्स इमारतीत असून दर 15 दिवसांतून एकदा वृद्धांची मेडिकल तपासणी करण्यात येणार आहे.