मलठण येथील खूनाचा गुन्हा ४ दिवसात उघडकीस; शिरूर पोलिसांची कारवाई; दोन आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील मलठण येथे ४ दिवसांपूर्वी दत्तात्रय दादाभाऊ कोठावळे या ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी वेगाने तपास करीत ४ दिवसांतच या खूनाचा छडा लावत दोन आरोपींना गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली.

शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रेय दादाभाउ कोठावळे हा तरुण रांजणगाव एमआयडीसीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याचा संशयास्पद मृतदेह शिरूर तालुक्यातील मलठण येथे एका शेतातील बांधाच्या कडेला ४ दिवसांपूर्वी आढळून आला होता. या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करीत मलठण येथीलच शरद रमेश वाघ व अनिल आनंदा कळसकर यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हयाची कबुली देत, मयत कोठवळे हा दारुच्या नशेत असताना त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आरोपींनी जबरदस्तीने चोरी केली होती. दत्तात्रय कोठावळे यांनी आरोपींना ओळखल्याने तसेच पोलीस स्टेशनला कोठावळे हा आपल्या विरोधात तक्रार दाखल करील या भितीने त्याला जवळीलच शेतात नेऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

शिरुर पोलीसांनी दोन्ही आरोपींना याप्रकरणी अटक करुन शिरूर न्यायालयात हजर केले असता आरोपींना सात दिवसाची कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.