जावयाला मारण्यासाठी सासूने दिली एक लाखाची सुपारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

घरच्यांच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या आईने चक्क जावयाला ठार मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील २० हजारांचा हप्ता दिल्यानंतर हल्लेखोरांनी जावयावर खुनी हल्ला केला; पण तो त्यातून बचावला. हडपसर येथे घडलेला हा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलिसांनी उघडकीस आणून चौघांना अटक केली आहे.

शैलेश संजय कांबळे (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ), चिक्या उर्फ कुलदीप हनुमंत तुपे (वय २१, रा. बिबवेवाडी), कृष्णा बाळुगोविंद राठोड (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर) आणि पवन विकास ओव्हाळ (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. सनी ऊर्फ संतोष गणपत यादव (वय २९, रा. हडपसर) यांना मारहाण करण्यात आली होती.

सनी उर्फ संतोष यादव हे ससाणेनगर येथे राहतात. पूर्वी ते काशेवाडी भागात राहायला असताना शेजारी राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिच्या घरच्यांचा विरोध डावलून काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे तरुणीची आई देवई अरुण बागवे (रा. भवानी पेठ) ही संतप्त झाली. त्यांनी भावाचा मुलगा शैलेश कांबळे याला घरी बोलावून घेतले. मुलीने सनीसोबत पळून जाऊन लग्न केले, त्याचा काटा काढायचा आहे. परत कोणी प्रेमविवाह करण्याचे धाडस करणार नाही. असे सांगून सनीच्या खुनासाठी कोणी आहे का बघ, आपण त्याला सुपारी देऊ, असे तिने त्याला सांगितले.

शैलेश कांबळे याने चिक्या उर्फ कुलदीप तुपे याच्याशी चर्चा करून देवई बागवेसोबत भेट घडवून दिली. तिने सनी यांना ठार मारण्यासाठी चिक्याला १ लाख रुपयांची सुपारी दिली. त्याचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये दिले. चिक्या आणि त्याच्या साथीदारांनी १७ जून रोजी सनी यादव यांना मध्यरात्री त्यांच्या दुकानात जाऊन तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यातून ते थोडक्यात बचावले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हल्लेखोर कात्रज येथे आले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कर्मचारी कुंदन शिंदे, अमोल पवार, प्रणव संपकाळ, उज्ज्वल मोकाशी यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतेल.

या चौघांकडे चौकशी केली असता, त्यात मुलीने प्रेमविवाह केला म्हणून त्या रागातून जावयाची हत्या करण्यासाठी बागवे हिने १ लाखाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. या चौघांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.