
सामना प्रतिनिधी । लातूर
शेतीच्या आणि शेतातील सामायिक विहिरीतील पाण्याच्या वादातून पुतण्याचाच चुलत्याने व चुलत भावांनी खून केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
लातूर येथील खाडगाव मधील जनार्दन साठे व त्यांचा भाऊ गोपाळ साठे यांच्यात जमिन व सामायिक विहिरीच्या पाण्यावर वाद होत होता. दिनांक 16 बुधवारी रात्री जनार्दन साठे यांचा मुलगा आकाश साठे (वय २४) हा शेतात गेला होता. त्यावेळी वाद काढून त्याचा चुलता व चुलत भावांना त्याला काठ्यांनी मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रात्री येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. आज खाडगाव भाग दिवसभर बंद राहिला. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील विलास गोविंद साठे व गोपाळ गोविंद साठे यांच्यासह त्यांच्या मुलांना ताब्यात घेतले आहे. माहिती पोलीस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी दिली.




























































