
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया धिम्या गतीने का होईना सुरू आहे. आतापर्यंत शिक्षकांच्या संवर्ग एक ते तीनपर्यंतच्या बदली पात्र शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता संवर्ग चारच्या बदल्या होणार असून, या संवर्गात शिक्षकांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यांत या बदल्या होणार आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे.
कोरोना संसर्गाची दोन वर्षे आणि तिसरे वर्ष ऑनलाइन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीनमधील 662 बदलीपात्र गुरुजींच्या बदल्या झाल्या आहेत. आता संवर्ग चार ज्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असून, या शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. या संवर्गात तीन टप्प्यांत शिक्षकांच्या बदल्या होणार असून, यातील पहिल्या टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांना ऑनलाइन प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी 21 ते 26 जानेवारी दरम्यान मुदत होती. त्यानंतर ऑनलाइन प्रणालीत 27 ते 31 जानेवारीदरम्यान संवर्ग चारच्या पहिल्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.
त्यानंतर याच संवर्गातील दुसऱया टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार असून, यात पात्र शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित होणाऱया शिक्षकांना अर्ज करण्यासाठी 2 ते 7 फेब्रुवारीदरम्यान मुदत राहणार आहे. त्यानंतर 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान विस्थापित होणाऱया शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील रिक्त असणाऱया सर्व शाळांमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात सुगम क्षेत्रात 10 वर्षे काम केलेल्या (अवघड क्षेत्राच्या बाहेर काम करणारे) शिक्षकांची यादी जाहीर करणे आणि अवघड क्षेत्रातील बदलीची प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी 23 फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या बदल्या
संवर्ग 1 – 299
संवर्ग 2 – 172
संवर्ग 3 – 191
संवर्ग 4 – बदली प्रक्रिया होणे बाकी
एकूण – 662