वैभव राऊतसह 12 जणांविरुद्ध आरोपपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहशतवादी कृत्याकरिता टोळी बनवून बेकायदेशीररीत्या स्फोटके व शस्त्र बनविल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्यासह राज्यातील विविध ठिकाणांहून पकडलेल्या एकूण 12 जणांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष सत्र न्यायालयात 6 हजार 842 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

राज्यातल्या विविध शहरांतील काही इसम घातपात करणार असल्याच्या संशयावरून एटीएसने नालासोपारा येथे राहणारा वैभव राऊत, शरद कळसकर व पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांना ताब्यात घेतले होते. तेव्हा शरदच्या घरझडतीत बॉम्ब बनविण्याची कृती लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या तर वैभवच्या घर व गाळ्याच्या झडतीत स्फोटके बनविण्याकरिता लागणारे साहित्य सापडले होते. त्यामुळे देशाच्या एकतेस व सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने स्फोटक साहित्यांचा साठा करून बॉम्ब बनविल्या प्रकरणी वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या गुह्याच्या तपासात श्रीकांत पांगरकर (40), अविनाश पवार (30), लीलाधर लोधी (32), वासुदेव सूर्यवंशी (19), सुजीथ कुमार (37), भारत कुरणे (37), अमोल काळे (34), अमित बड्डी (27) व गणेश मिकसिन (28) या नऊ जणांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली होती. या 12 जणांविरोधात स्फोटक पदार्थाचा कायदा, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, आर्म्स ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आदी कायदा व कलमांनुसार एटीएसएने दोषारोपपत्र दाखल केले.