एसटीने ठोकर दिली तो नर्मदा नदीचा कठडा तगलादू; प्राथमिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील इंदूर ते अंमळनेर मार्गाची एसटी बस समोरून येणार्‍या भरधाव वाहनाची धडक टाळण्याच्या नादात कठडा तुटून नर्मदा नदीत कोसळल्याच्या घटनेचा प्राथमिक अहवाल समोर आला असून त्यात या नदीचा कठडा अतिशय तकलादू स्वरूपाचा असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच ही बस दहा वर्षे जुनी असून तिचे फिटनेस सर्टीफिकेट 27 जुलै रोजी संपणार होते अशीही माहिती उघडकीस आली आहे.

इंदूर शहरातून निघालेली ही अपघातग्रस्त बस जळगावच्या अमळनेर आगाराची होती. ही बस दहा वर्षे जुनी असून तिची नोंदणी नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये 12 जून 2012 रोजी करण्यात आली होती. या बसचे फिटनेस सर्टीफिकेट अवघ्या दहा दिवसांनी 27 जुलै रोजी संपणार होते अशी माहिती उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात ज्या खलघाटाच्या नर्मदा नदी पुलावर हा भीषण अपघात घडला त्या पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. तो कठडा अतिशय तकलादू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

एसटीच्या ताफ्यात 16 हजार बसेस असून अनेक बसेसचे आयुष्य संपलेले असून त्यांना पावसाळ्यासाठी पॅचवर्क करून वापरले जात आहे. अलिकडेच पालघरच्या वाघोबा घाटात एसटीचा स्लिपर कोच कोसळून पंधरा प्रवासी जखमी झाले होते. सहा वर्षांपूर्वी 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई ते गोवा मार्गावर महाड येथे पुल तुटल्याने सावित्री नदीच्या पात्रात दोन एसटी आणि कार वाहून गेल्याने 40 जण ठार झाल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेने या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. एसटी प्रवाशाच्या तिकीटातून एक रूपया विमा म्हणून घेतला जात असतो. त्यातूनच मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची नुकसान भरपाई मिळत असते.

अपघाताच्या चौकशीकरीता त्रिस्तरीय समिती
या बसच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यात उप महा व्यवस्थापक, उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी आणि प्रादेशिक अभियंता अशा तिघांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून ती आपला सविस्तर अहवाल देणार आहे. तसेच अपघातस्थळी मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या धुळे आगाराचे विभाग नियंत्रक पोहचले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यासंदर्भात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलला नाही.