नाशिक येथून हिंगोली येथे परीक्षेच्या कामानिमित्त आलेल्या तरुण अभियंत्याचा हिंगोली तालुक्यातील पारोळा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
नाशिक येथील म्हसरूळ भागातील संभाजीनगर, चिंतामणी पार्क, केतकी सोसायटी येथील घर क्रमांक ५ अभियंता देवेंद्र प्रकाश बुरुड (३१) हा हिंगोली येथे बुधवारी सकाळी परीक्षेच्या कामानिमित्त एका महाविद्यालयात आला होता. शहरातील रामाकृष्ण लॉज येथे त्याने एक रूम बुक केली होती. बुधवारी रात्री लॉजवर मुक्काम केला. दरम्यान, गुरुवारी देवेंद्र बुरुड हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील पारोळा फाटा येथे गेला होता.
ऑटोचालकाने काही वेळ त्याची वाट पाहिली. मात्र, देवेंद्र परत आला नसल्यामुळे ऑटोचालक माघारी निघून आला. गुरुवारी लॉजवरून बाहेर पडलेला देवेंद्र बुरुड रात्री उशिरापर्यंत लॉजवर आला नाही. त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे कुटुंबीयांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. लॉजचालकाने ही माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय रामोड, जमादार आकाश पंडितकर व आदींच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला होता. तसेच सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनीही देवेंद्र याच्या मोबाईलचे लोकेशन काढण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी पारोळा येथील तलावात एक मृतदेह आढळल्याची माहिती तेथील पोलीसपाटलाने हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा मृतदेह देवेंद्र बुरुड याचा असल्याचे समोर आले. हा मृतदेह हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर देवेंद्र बुरुड याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी दिनेश प्रकाश बुरुड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. डी घुमनर यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार आकाश पंडितकर करीत आहेत.