‘तांबे पिता-पुत्रामुळे थोरात अडचणीत, त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं की…’, छगन भुजबळ यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक पदवीधर मतदारसंघ गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींनी ढवळून निघाला आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म घेऊनही अर्ज भरला नाही. उलट त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. अखेर पक्षशिस्त मोडणाऱ्या तांबे पिता-पुत्रावर काँग्रेसने कारवाई केली आणि त्यांनी निलंबित केले. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. सुधीर तांबे दोन-तीन वेळा एमएलसी झाले. डाऊन टू अर्थ ते रहायचे. स्वत: आमदार असले, त्यांचे मेहुणे वगैरे पुढारी-मंत्री असले, तरी त्यांना गर्व निश्चित नव्हता. पण त्यांनी असे अचानक का करावे हेच मला कळले नाही. त्यांना सरळ सांगता आले असते की मला एबी फॉर्म नको, मी उभा राहणार नाही. द्यायचा असेल तर सत्यजीतला द्या. सत्यजीतलाही देता आला असता. परंतु त्यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी फार अडचणीत आणले आहे. त्याचे मला खुप वाईट वाटते, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.

नक्की काय घडलं?

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐन वेळी डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला.