सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करताच राष्ट्रवादीने केला जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश करताच त्याचे वेगळेच पडसाद शहरात उमटले. विखे यांना दोन्हीही काँग्रेसने उमेदवारी देऊ नये या मतावर ठाम असलेल्या राष्ट्रीवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

विखे यांनी भाजपात प्रवेश केल्या नंतर नाईक चौकात नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, माजी नगरसेवक चांद मणियार, चंद्रकांत भापकर, फारूक शेख, आबासाहेब काळोखे, योगेश रासने, देवा पवार, अनिकेत निनगुरकार, कपिल अग्रवाल, सोमनाथ टेके, अजित चौनापुरे, राजेंद्र बोरुडे हे नाईक चौकात जमा झाले व त्यांनी विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देत फटाके फोडले. या वेळी बोलताना नगरसेवक बंडू बोरुडे म्हणाले की, विखे कुटुंबाने काँग्रेसच्या जीवावर अनेक पदे मिळवली मात्र ते कधीही काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले नाहीत. त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता मात्र मंत्रिपद मिळूनही त्यांनी शेवटी शिवसेना सोडली. स्व. राजीव गांधी व जेष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा विरोध करण्याचे काम विखे यांनी केले. विरोधी पक्षनेतेपद, जि. प. अध्यक्षपद विखे घराण्यात असूनही त्यांनी भाजपात प्रवेश केला असला तरीही भाजपचे नाराज, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची मदत घेत विखे यांचा आम्ही पराभव करु असे बोरुडे यांनी सांगितले. या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.