कॅम्पर व्हॅनद्वारे लुटता येणार निसर्गाचा मुक्त आविष्कार, कोल्हापुरातील मामा-भाच्याची अनोखी संकल्पना, हिंदुस्थानातील पहिला प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊन-पावसाचा लपंडाव, तर कधी धुक्यात हरवणारे पहाटेचे निसर्गसौंदर्य, तर कधी रात्रीच्या वेळी आकाशातील शुभ्र चांदण्यांचं पांघरुण घेण्याचा अभूतपूर्व पर्यटनाचा रोमांचक अनुभव आता पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावर सुरक्षित वातावरणात ‘कॅम्पर व्हॅन’च्या माध्यमातून पर्यटकांना घेता येणार आहे. जेवण, नाश्ता, पठारावर फिरण्यासाठी सायकल, मनोरंजनाची सोय, विविध खेळांचे प्रकार, योगा आणि विश्राम करण्यासाठी तंबू ज्यामध्ये वीस लोक आरामात राहू शकतील, अशी अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त ही व्हॅन सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मामा-भाच्याच्या जोडीने हा अभिनव प्रयोग राबविला आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सूर्यकांत गुरव आणि त्यांचे राधानगरी येथील भाचे पंकज गुरव यांनी ही कॅम्पर व्हॅन साकारली आहे. कॅम्पर व्हॅन बनविण्याची मूळ संकल्पना पंकज गुरव यांची आहे. व्हॅनला पूर्णत: नवे रूप देण्यात येऊन अत्याधुनिक सेवा असणारी ही व्हॅन तयार केली आहे. पंकज हे व्यवसायानिमित्त परदेशात असतात, तर त्यांचे मामा सूर्यकांत गुरव ही सेवा पुरवित आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या कॅम्पर व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.

हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले दहा किमीचे मसाई पठार हे 200 ते 800 फूट रुंद अशा वेगवेगळ्या दहा पठारांचे मिळून बनलेले आहे. सर्व सोयींयुक्त असलेल्या या कॅम्पर व्हॅनला पर्यटकांची पसंती मिळत आहे. या सफरीसाठी दोन दिवस आधी बुकिंग करणे आवश्यक आहे. प्रतिव्यक्ति 1200 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

कॅम्पर व्हॅनची वैशिष्ट्ये

यामध्ये स्वतंत्र किचन, टॉयलेट, बाथरूम व आंघोळीला गरम पाण्यासाठी गॅस गिझर, एकाचवेळी शाकाहारी व मांसाहारी जेवण, चहा, कॉफी व दोनवेळच्या नाश्त्याची सोय आहे. मनोरंजनासाठी वायरलेस माईक, कराओके म्युझिक सिस्टीम, गिटारवादन, एच.डी. प्रोजेक्टर व स्क्रीन यांची सोय आहे. पठारावर फिरण्यासाठी सायकल उपलब्ध आहे. तसेच चेस, ल्युडो, फुटबॉल, मेडिटेशन, व योगासाठी योगा मॅट, कॅम्प फायर, फ्री वाय-फाय, विश्राम करण्यासाठी किमान वीस व्यक्ती राहू शकतील, असा आरामदायक तंबू.

सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय पर्यटकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणे परवडत नाही. या पर्यटकांना ते अनुभवायला मिळावे, हा मुख्य हेतू आहे. अनेक मध्यमवर्गीयांना छोट्या-मोठ्या पार्टीज सवलतीच्या दरात करता येतील. कॅम्पर व्हॅनचा हा संपूर्ण राज्य तसेच देशातील हा पहिलाच प्रयोग असून, पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच राधानगरी बॅक वॉटर, कागल तलाव व कोकणातही असे कॅम्पर स्पॉट उभारणार आहे.
-पंकज गुरव, प्रोप्रायटर, राधानगरी (सध्या दुबई)

निसर्गाच्या मुक्त वातावरणात पर्यटनाचा मनमुराद आनंद एकाच छताखाली पर्यटकांना मिळावा यासाठी या कॅम्पर व्हॅनची निर्मिती केली आहे. यामध्ये आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत तसेच जिल्ह्यात कोणत्याही पसंतीच्या पर्यटनस्थळी पर्यटकांनी व्हॅन बुक केल्यास तेथेही सेवा देण्यात येईल.
– सूर्यकांत गुरव, प्रोप्रायटर, कॅम्पर व्हॅन