
एसटीच्या प्रवासात महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक आपले ओळखपत्र दाखवून सवलतीचा लाभ घेत होते. त्यांना प्रवासात कोणतीही अडचण येत नव्हती. असे असताना एनसीएमसी कार्डच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला. अचानक कार्ड सक्तीची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा सवलतीचा एसटी प्रवास संकटात सापडला आहे.
वाहकांना कोणतेही प्रशिक्षण न देता केवळ एका मेसेजवर कार्ड सक्तीची सूचना देणे अत्यंत चुकीचे आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अन्यथा कामगार संघटनेला आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला. महामंडळाने कोणतीही प्रसिद्धी न करता अचानक कार्ड सक्ती लागू केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांना मनस्ताप झाला. एनसीएमसी कार्डच्या सेवेत अनंत त्रुटी आढळून आल्या आहेत, असे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले.
रिक्षाचालकांना मुदतवाढ, मग बहिणींना का नाही? सरकार जर मराठी भाषा सक्तीसाठी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ देऊ शकते, तर मराठी नागरिक, लाडक्या बहिणींना मुदत का देत नाही, असा सवाल महिला प्रवासी प्रियंका डुबुले यांनी उपस्थित केला.
























































