महिलांची माफी मागा अन्यथा गाल आणि थोबाड रंगवू; राष्ट्रवादीवरील टीका दरेकरांना भोवली  

राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टीका करणं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.  या वक्तव्याबद्दल महिलांची माफी मागा, अन्यथा गाल आणि थोबाड रंगवून दाखवू असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान दरेकर यांनी, मी जे म्हणालो ती मराठीतील एक म्हण असल्याचं सांगत सारवासारव केली आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रवीण दरेकर यांनी ‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे’, असं विधान केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात दरेकरांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही. तसं काही कारणच नाही. राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे, असं म्हणत दरेकर यांची पाठराखण केली आहे.

दरेकर काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.

काय म्हणाल्या चाकणकर?

आपल्या बोलण्यातून दिसणारं वैचारिक दारिद्रय़ संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.  तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल महिलांची माफी मागाकी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या