गेवराई नगर परिषदेत कामे न करताच कंत्राटदारांना दिली देयके; चौकशीची मागणी

प्रत्यक्षात काम झाले नसतानाही कागदोपत्री झाल्याचे दाखवून 19.32 लाख रुपयांची देयके गेवराई नगर परिषदेने दिली आहेत. नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमताने हा अपहार केला आहे. कामे झाली नसतानाही कामाची देयके कंत्राटदारांना कशी देण्यात आली, असा सवाल विचारण्यात येत आहे. गेवराई नगर पालिकेत अनागोंदी कारभार सुरू असून या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसिलदारांना यांना दिले आहे.

कोल्हेर रोड-म्हाडा कॉलनी ते ईरा शाळेपर्यंत हा रस्ता नगर पालिकेच्या हद्दीत नसतानाही तेथे नाली बांधकाम करून 17.98 लाख रुपये गेवराई नगर परिषदेने खर्च केले आहेत. हे काम कोणाच्या फायद्यासाठी केले असा सवाल करण्यात येत आहे. नियमबाह्यपणे हद्दीच्या बाहेरील केलेल्या कामावर खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करून दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसिलदारांना दिले आहे. नगर परिषदेतील वारंवार उघडकीस येणाऱ्या भ्रष्टाचारामुळे भाजपा आमदारांच्या कार्यपध्दतीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 2018-19 च्या दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून 19 लाखांची रक्कम कंत्राटदाराला कोल्हेर रोड ते म्हाडा कॉलनी येथे नाली बांधकाम केल्याचे दाखवून अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रत्यक्षात काम न करता बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून सर्वांच्या संगनमताने हा निधी लाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

गेवराई नगर परिषदेने कोल्हेर रोड भागात मोठ्या प्रमाणावर हद्दीच्या बाहेर निधी खर्च केला असून एकीकडे शहरातील रस्ते आणि नाल्यांची दुर्दशा झालेली असताना कोल्हेर रोड भागात कोणाच्या फायद्यासाठी हा सार्वजनिक निधी खर्च केला जात आहे, असा सवालही उपस्थित केला आहे. नगर परिषदेच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या बाबतचे लेखी निवेदन त्यांनी तहसिलदार, गेवराई यांना दिले आहे. यावेळी नगरसेवक राधेशाम येवले, शहराध्यक्ष दिपक आतकरे, तालुकाध्यक्ष, ऋषिकेश बेदरे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या