बागेश्वर बाबावर कारवाई झाली पाहिजे, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी कायदा करण्याची मागणी करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका सुरू झाली असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बागेश्वर बाबा कोण आहे. त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्यसरकारने कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. नवनवीन प्रश्न आपल्यासमोर येत आहेत त्यात तथ्य आहे की नाही यामुळे लोकं बुचकळ्यात पडले आहेत. शेअरबाजार काही लाख कोटीने कोसळत आहे हे काय गौडबंगाल आहे कळायला मार्ग नाही. यावर केंद्रसरकारने, अर्थमंत्रालयाने जाहीर खुलासा करायला हवा. देशातील लोकं धास्तावले आहेत, बुचकळ्यात पडले आहेत आणि नक्की काय झालंय ज्यांच्यावर आरोप झालाय तीच कंपनी बोलत आहे. आणि ज्या परदेशी कंपनीने आरोप केलाय असे दोघेच बोलत आहेत. आणि बाकीचे नुसतीच चर्चा करत आहेत. यातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे कोण म्हणतंय यात एलआयसीचे 75 हजार कोटी रुपये अडकले आहेत खरंच अडकले आहेत का? नक्की काय झालंय, नक्की कुठे पाणी मुरतंय की मुद्दाम बदनामी सुरू आहे हे सगळे जनतेला कळायला हवे ना… मुळात तेच कळू देत नाही असेही स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

आताचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरचा दर वाढला आहे, प्रचंड महागाई वाढली आहे, यापासून केंद्रसरकारने देशातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये रेल्वेचा निधी मिळायला हवा. सरकारने वेगवेगळ्या खात्यांचा निधी असतो तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे ही महाराष्ट्राचा नागरीक म्हणून अपेक्षा आहे असेही अजित पवार म्हणाले.

”बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकुनही राज्याचं पालकत्व असणारे शांत”, रोहित पवारांचा संताप

हे सरकार गोरगरीबांचे नाही ‘सर्वसामान्यांचे… सर्वसामान्यांचे सरकार’ आहे असा टोला अजित पवार यांनी लगावतानाच भाजप आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर ‘दादा देऊ काही काळजी करू नका’ लवकरच देऊ..दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय आहे विचारतात मात्र वेळ काही मिळत नाही. त्या दोघांचे काय सुरू आहे माहित नाही. त्यांचे त्यांनाच माहीत. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही. कुणी वेळ मागितला तर वेळ द्यायचा असतो. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलणं सोपं असतं पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलचा फायनल निर्णय घेऊन पुढे मार्ग काढणे ही तारेवरची कसरत असते. परंतु तसे काम करताना हे सरकार पहायला मिळत नाही. पण सुरु आहे आमचं ‘सर्वसामान्यांचे सरकार’ बोलणं मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलत आहेत. तरीही आमचे ‘सर्वसामान्यांचे सरकार ‘सुरू आहे अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.