
दावोसमध्ये करण्यात आलेल्या बोगस गुंतवणुकीचा धुरळा अजून खाली बसला नाही, तोच सरपंचाच्या प्रवेशातही झोलझाल झाल्याचे समोर आले आहे. पाथरी तालुक्यातील 49 पैकी 34 सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, मग मुख्यमंत्र्यांकडे गेलेले मिंधे कोण? असा सवाल करत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बोगस प्रवेश सोहळ्याचा भंडाफोड केला. ज्यांना मिंधे गटात प्रवेश देण्यात आला, त्यापैकी कोणीही सरपंच नसल्याचा दावाही आमदार दुर्राणी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील काही सरपंचांनी मिंधे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरही त्याची माहिती देण्यात आली. ही माहिती व्हायरल होताच परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पाथरी मतदारसंघातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची लोणकढी थाप खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच सोशल मीडियावर मारण्यात आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले. पाथरी तालुक्यातील सरपंचांनी एकमेकांना फोन करून ख्यालीखुशाली विचारली आणि कुठे आहात, याची चौकशी केली. सर्व जण तालुक्यातच असल्याची खातरजमा झाल्यानंतर हा प्रकार आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या कानावर घालण्यात आला. पाथरी तालुक्यातील 49 पैकी 34 सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत? मग शिंदे यांच्या उपस्थितीत कोणत्या 40 सरपंचांनी प्रवेश केला, असा प्रश्न सर्वांनाच पडला. अधिक चौकशी केली असता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार्या मिंध्यांपैकी एकही जण सरपंच नसल्याचे स्पष्ट झाले.
खोक्यांचे आमिष…
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सरपंचांच्या बोगस प्रवेश सोहळ्याचा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकारांसमक्षच भंडाफोड केला. तालुक्यातील शिंदे गटाच्या काही पुढार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खोक्यांचे आमिष दाखवले. शिंदे गटात येण्यासाठी त्यांच्यावर हरतर्हेने दबाव आणण्यात आला. एवढेच नाही तर अनेकांना न विचारताच त्यांची नावे यादीत टाकण्यात आली आणि ४० सरपंच सोबत असल्याचा आव आणण्यात आला. हा प्रवेश सोहळाच खोटारडा असून, प्रवेश केलेल्यांमध्ये अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. प्रवेश देताना निदान शहानिशा तरी करायची, असा टोलाही यावेळी आमदार दुर्राणी यांनी लगावला.
प्रवेश देताना जरा शहानिशा तरी करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाले, हे खरे पण त्यात पाथरी तालुक्यातील सरपंच किती? हिंमत असेल तर याची खरी माहिती द्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झोप न घेता काम करतात, कदाचित चिल्लर कार्यकर्त्यांना प्रवेश देताना त्यांना डुलकी लागली असावी, असा टोला आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लगावला.
पोलखोल : दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच
या पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, जि.प. चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, तहसीन अहेमद खान, चक्रधर उगले, दत्ता मायंदळे व सुमंत वाघ आदी उपस्थित होते.

























































