मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही! पुलवामाबाबत सत्यपाल मलिक ‘सत्य’च बोलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारचा हलगर्जीपणा, अकार्यक्षमता आणि चुकीमुळेच पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते, असा गौप्यस्पह्ट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच केला आहे. मलिक ‘सत्य’च बोलत आहेत. जे सरकार जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सुनावले.

सासवड येथील पालखी तळावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.

सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली असतानाच यावर शरद पवार यांनीही आपले स्पष्ट मत मांडले आहे. पवार म्हणाले, ‘कश्मीरातील पुलवामा येथे 40 जवान शहीद झाले होते. त्यावेळी सत्यापाल मलिक हे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपच्या विचारांचे होते. भाजपनेच त्यांना नियुक्त केले होते. मलिक यांनी आता जे सांगितले ते सत्य आहे. आपल्या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी विमाने आणि आवश्यक ती साधने वेळेवर सरकारने न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधानांनी मलिक यांना या विषयावर गप्प राहण्यास सांगितले होते. आपल्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी जे सरकार पार पाडत नाही त्या सरकारने सत्तेत का राहावे? अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, असे पवार यांनी फटकारले.

शेतकरी संकटात असताना सरकारकडून अद्याप मदत मिळाली नाही
दहा दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात शेतकरी मेळाव्याला गेलो होतो. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने संकटात आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. निसर्ग आपल्या हातात नाही; पण संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे हाहाकार झाला, पण अद्याप मदत मिळाली नाही याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. जे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत नाही त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकारी नाही, असे पवार यांनी फटकारले. शेतीमाल निर्यातीला बंदी घालताना मात्र विदेशी माल आयात करण्यास परवानगी देणाऱ्या केंद्राच्या धोरणावरही पवार यांनी आसूड ओढले.