
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार असून त्यांची आज बैठक बोलावली असल्याच्या वावड्या मंगळवारी सकाळपासून उठायला सुरुवात झाली होती. स्वत: अजित पवारांनी याचे खंडन केल्यानंतरही या अफवा जोरात सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की ही 100 टक्के खोटी गोष्ट आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक गट बनवून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असून ते लवकरच मुख्यमंत्री बनतील अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. भाजप नेतेही त्यासंबंधी उलटसुलट वक्तव्ये देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भर पडली ती काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची. माध्यमांतून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या असत्य असल्याचे सांगत स्वतः अजित पवार यांनीच या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तरीही ही चर्चा थांबायचे नाव घेत नाहीये.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची काहीतरी बैठक आहे. 100 टक्के खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक नाही. कोणीही बोलावलेली नाही. प्रदेशाध्यक्ष हे त्यांच्या भागात मार्केट कमिटी निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवारही याच कामात असून इतरांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी इतर कोणावरही नाही, त्यामुळे हे लोकं त्यांच्या कामात गुंतलेली आहेत. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत आहे. पवार यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेचे आहेत. याच्यापेक्षा दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही. माझी कोणतीही बैठक नाही. देहूला कार्यक्रम आहे, त्यानंतर मी रात्रीच्या मुक्कामाला मुंबईला जाणार आहे.


























































