नीरज चोप्राची फ्रान्समध्ये “सुवर्णफेक”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | सोत्तेविले

जागतिक अॅथलेटिक्स क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव उज्वल करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने फ्रान्समधील सोत्तेविले अॅथलेटिक्स मिटमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने ८५.१७ मीटरवर भालाफेक करीत टॉपच्या स्थानासह सुवर्णपदकाची कमाई केली .त्याने मोल्दोवाच्या अँड्रिअन मरदरेला (८१.४८ मीटर ) मागे टाकत सोनेरी पदक मिळवले. तिसरे स्थान लिथुआनियाचा एडिस मटूसेव्हिसिस (७९.३१ मीटर ) याने पटकावले. २०१२ च्या ऑलीम्पिकमध्ये भालाफेकीचे सुवर्णपदक मिळवणारा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशोर्ण वॉलकॉट ( ७८.२६ मीटर ) पाचव्या स्थानी राहिला.

नीरजने यापूर्वी गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (८६.४७) या कामगिरीसह सुवर्णपदक मिळवले होते,असा पराक्रम करणारा तो पहिलाच हिंदुस्थानी अॅथलिट ठरला आहे. त्याने दोहा डायमंड लीग स्पर्धेत ८७.४३ मीटर फेकीसह राष्ट्रीय विक्रम मोडला होता. मात्र त्या स्पर्धेत तो पाचव्या स्थानावर राहिला होता.