‘नेस्को’च्या कोविड सेंटरमधील आरोग्य सुविधा ‘उघड्यावर’! ‘नेस्को’ प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईने चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावच्या ‘नेस्को’ प्रशासनाने पालिकेने सुरू केलेल्या कोविड सेटर फेज – 2मधील आरोग्य सुविधा तातडीने बाहेर काढून उघड्यावर ठेवल्याने पालिकेच्या कोटय़वधीच्या आरोग्य सुविधेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका आयुक्तांनी हे कोविड सेंटर बंद करण्याची परवानगी दिल्याचे सांगत ही कार्यवाही करण्यात आली. मात्र अचानक आरोग्य सुविधा बाहेर काढल्याने प्रशासनाच्या मुजोरीवर संताप व्यक्त होत आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेने तिसऱ्य़ा लाटेचा सामना करण्यासाठी गोरेगाव पूर्व इथल्या नेस्कोतील ई हॉलमध्ये दीड हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारले. यात 1 हजार बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. जुलै 2021मध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरुवात झाली. यातील 700 बेड हे ऑक्सिजन पाइपलाइनने जोडण्यात आलेत. यासाठी 13 के 1 क्षमतेची नवीन टाकी काही दिवसांपूर्वी येथे बसवण्यात आली असून 250 रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्रकल्प बसवून तयार करण्यात आलेत. सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिवाय 20 व्हेंटिलेटरही आहेत. सद्यस्थितीत दुसरी लाटही पूर्ण नियंत्रणात आली असली तरी अचानक कोविड सेंटरची एक फेज बंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सेंटरमधील आरोग्य सुविधा इतर ठिकाणी वापरणार

गोरेगाव येथील जम्बो कोविड सेंटर फेज – 2 बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या सेंटरमधील साहित्याचा वापर इतर ठिकाणी केला जाणार आहे. आवश्यक असेल तिथे हे साहित्य उपलब्ध केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.