
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी द्राक्ष महोत्सव, वाईन महोत्सव, विदर्भीय खाद्यमहोत्सव, मिसळ महोत्सव, महाराष्ट्रीय खाद्यमहोत्सव असे वेगवेगळे खाद्य महोत्सव आयोजित केले जातात. आता महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काळ्या गव्हाच्या चपातीचा अनोखा बेत रचण्यात येणार आहे. त्यासाठी काळ्या गव्हाच्या शेतीचा अनोखा प्रयोग राज्याच्या कृषी विभागाने यशस्वीरीत्या राबवला आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी शेतीचे वेगवेगळे प्रयोग राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वरमध्ये काळ्या गव्हाच्या शेतीचा अतिशय अनोखा व नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात येत आहे. पंजाबमधील मोहालीमध्ये काळ्या गव्हाची शेती यशस्वीरीत्या राबवली आहे. त्यामुळे महाबळेश्वरचे कृषी सहाय्यक दीपक बोर्डे यांनी पंजाबमधील मोहालीमधून एनबीएमजी हे काळ्या गव्हाचे वाण मागवले. सध्या महाबळेश्वर, वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातील शेतकऱयांना चारशे किलो काळ्या गव्हाचे बियाणे दिले आहे. काळ्या गव्हाला पाणीही कमी लागते. त्यामुळे सांगलीमधील जत या दुष्काळग्रस्त भागात व वर्ध्यासारख्या उष्ण भागातही काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग राबवला आहे. महाबळेश्वरमध्ये काळ्या गव्हाची शेती यशस्वी झाली असून मार्च एप्रिलमध्ये काळ्या गव्हाचे पीक कापणीला येईल.
रोग पडत नाही
गव्हावर तांबेरा नावाचा रोग येतो. काळ्या गव्हावर तांबेरा पडत नाही.
काळ्या गव्हाचे आरोग्याला फायदे
काळ्या गव्हामध्ये झिंक, मँगनिज, लोहाचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अँथोसायनिन नावाचा घटक आहे. त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. शरीराचा थकवा कमी होतो. मेंदूवरील ताण कमी होतो. काळ्या गव्हात शर्करेचे प्रमाण कमी आहे. मधुमेही रुग्णांना काळ्या गव्हाची चपाती फायदेशीर.
शेतकऱयांना आर्थिक फायदा
नेहमीचा गहू सरासरी 25 रुपये किलो दराने विकला जात असेल तर काळ्या गव्हाला 50 रुपये किलो दर मिळतो.
महाबळेश्वरमध्ये वर्षाला सरासरी दहा लाख पर्यटक येतात. काळ्या गव्हाच्या शेतीला पर्यटनाची जोड देऊन काळ्या गव्हाची चपाती असा बोर्ड हॉटेलच्या बाहेर लवकरच लागेल. जिल्हा माहिती अधिकारी काळ्या गव्हावर डॉक्युमेंटरी करणार आहेत.
-दीपक बोर्डे, कृषी सहाय्यक, कृषी विभाग
































































