
सामना प्रतिनिधी, निलंगा
निलंगा महसूल उपविभागात दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जवळपास 209 बोअर व विहीर अधिग्रहण करून जनतेसाठी पाण्याची उपाययोजना केली आहे. तसेच भीषण पाणी टंचाई असलेल्या गावात 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी निलंगा तालुक्यातील 87 गावातील 148 बोअर/विहीर अधिग्रहण केले आहेत. त्यात प्रामुख्याने शेडोळ, पानचिंचोली, निटूर, हलगरा, मदनसुरी, तुपडी, मिरगनहाळ्ळी, कासार शिरसी, शिंदीजवळगा, मुगाव, बडूर, उस्तुरी, गुंजरगा, चांदोरी मानेजवळगा, दापका यासह अनेक इतर गावांचा समावेश आहे. देवणी तालुक्यातील 24 गावातून 36 बोअर /विहीर अधिग्रहण केले आहेत. यात प्रामुख्याने बोंबळी,बोरोळ टाकळी, होनाळी, देवणी खुर्द, विळेगाव, हंचनाळ, कोनाळी आनंदवाडी यासह अनेक गावांचा समावेश आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 17 गावातून 25 बोअर /विहीर अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. यात प्रामुख्याने अंबुलगा सय्यद, उजेड, अंकुलगा राणी, आजनी बु. तळेगाव बोरी, होनमाळ, बाकली,बिबराळ यासह इतर अनेक गावांचा समावेश आहे.
निलंगा तालुक्यातील ज्या गावांमध्ये बोअर/विहीर अधिग्रहण करण्यास उपलब्धता नसेल अशा भीषण पाणी टंचाईग्रस्त सात गावात 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात लिंबाळा, शिरशी हंगरगा, हाडगा, हलगरा,दापका, माकणी व निटूर या गावांचा समावेश आहे. देवणी तालुक्यात 6 गावांमध्ये 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात अनंतवाडी, इस्मालवाडी, बोळेगाव, सय्यदपुर, चवण हिप्परगा, तळेगाव, विळेगाव या गावांचा समावेश आहे. इतरही अनेक पाणी टंचाईग्रस्त गाव, वस्ती, तांडा येथून पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव येत आहेत. प्रशासनाकडून तातडीने त्यावर निर्णय घेतला जात असल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके यांनी दिली.





























































