‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना ‘प्रत्यक्ष’ पहायचेय, सर्वोच्च न्यायालयात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया बलात्कार प्रकरणातील त्या नराधमांना फासावर लटकताना प्रत्यक्ष पहायचेय… अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हैदराबाद, उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील त्या नराधमांना फासावर कधी लटकवणार असा सवाल करण्यात येत असून आता त्या नराधमांना प्रत्यक्ष फासावर लटकताना आम्हाला पहायचेय, त्यांना एका महिन्याच्या आत फासावर लटकवा आणि या फाशीचे थेट प्रक्षेपण करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर 17 डिसेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. निर्भयाच्या कुटूंबीयांसाठी हा अत्यंत महत्वपूर्ण खटला आहे. त्यांना या आरोपींना प्रत्यक्ष फासावर लटकताना पाहाता यावे यासाठी तशी व्यवस्था करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांतील खटले फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यात यावेत तसेच सहा महीन्यात निकाली काढावेत यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणांमध्ये हायकोर्टात करण्यात आलेल्या याचिका चार महीन्यात तर सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिका तीन महीन्यात निकाली काढण्याची मागणीही याचिते करण्यात आली आहे.