
सामना प्रतिनिधी । परभणी
ग्रामीण भागासह शहरी भागातही दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस गडद होत असल्याने त्याचा फटका अनेक व्यापारी प्रतिष्ठानला बसत आहे. वाढता खर्च न परवडणारा असल्याने मोठ्या प्रमाणात नौकरकपात केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल ५० टक्के सुट दिली जात आहे. खर्च न परवडणारा असल्याने अनेकांनी दुकानांचे स्थलांतर करणे पसंत केल्याचे परभणी शहरातील मध्यवस्तीत चित्र दिसून येत आहे.
यंदाच्या दुष्काळाची धग सामजिक-आर्थिक आणि व्यापारी क्षेत्राला होरपळून काढत आहे. हाताला काम नसल्याने पैशाची आवक थांबली आहे. परभणी शहरातील मध्यवस्तीत असलेले अनेक दुकाने अक्षरश: बंद झाली आहेत. नौकरांचा पगार देखील करणे जिकरीची बाब होऊन बसली आहे. दुष्काळाने असंख्य संकटे समोर येऊन ठेपली आहेत. एकीकडे बेताची परिस्थिती आणि पाणीटंचाई यामुळे या दुष्काळाशी दोन हात करताना सामान्यांचे अक्षरश: कंबरडे मोडून गेले आहे. ग्रामीण भागात अर्थव्यवस्थाही शेतीवरच अवलंबून असते. शेती आणि पुरक व्यवसाय यावरच चार पैसे हाताशी येतात. त्यातूनच बाजारहाट करावी लागते. पैशाची आवकच थांबल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परभणी शहराच्या मध्यवस्तीत असणारे अनेक व्यावसायिक अक्षरश: आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या बेतात आहेत. काही दुकानदारांनी तर आपला माल विक्री व्हावा, यासाठी ५० टक्के सवलत दिली आहे. दसरा आणि दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी अनेकांची नोकरभरती केली होती. आता दुष्काळामुळे नोकरांचा पगार देखील निघणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांनी पैशाची आवकच नसल्याने नोकर कपात धोरण अवलंबिले आहे. काहींनी किरायचे दुकान परवडत नाही, त्यामुळे स्थलांतर करणे पसंत केले आहे.
दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम शहरी अर्थचक्रावर झाला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतने अनेकजण होरपळून निघत आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी अन्य व्यवसाय निर्मितीची कोणतही व्यवस्था नसल्याने अनेकजण आपले गाव सोडून पुणे, मुंबई, संभाजीनगर सारख्या मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. शासकीय योजनेंमार्फत चालविण्यात येणाऱ्या रोहयोच्या कामांना अद्यापही मुहूर्त लागला नसल्याने केवळ प्रतिक्षा करण्यातच दिवस काढावे लागत आहेत. बाजारापेठमध्ये केवळ सणा-वाराच्या निमित्तानेच खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असताना दिसत आहेत. अनेक व्यापारी हे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची प्रतिक्षा करत असताना आपला दिवस घालवत आहेत. यंदा पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या झाल्या नाहीत. काही काम करावे, म्हटले तर कामही मिळेना. त्यामुळे मोठ्या शहराला जाण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारामध्ये व्यापाऱ्यांवर आपली प्रतिष्ठाने कमीत कमी मनुष्यबळावर कशी चालविता येईल, याकडे भर दिल्या जात आहे. वाढता विद्युत खर्च त्यात मनपाचा कर आणि जीएसटी यामुळे व्यावसय चालविणे दिवसेंदिवस कठीण बाब होऊन बसली आहे. काही दुकानदारांनी तर आपला माल विक्री व्हावा, यासाठी तब्बल ५० टक्के सुट देण्याचे जाहीर केले आहे. तर वाढता नोकरांचा खर्च आणि अन्य खर्चामुळे मुख्य रस्त्यावरील जागा सोडून अनेक व्यापारी अन्यत्र दुकाने स्थलांतरीत करत आहेत.




























































