
सामना ऑनलाईन । सिओल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या वर्षी फेब्रुवारीमध्ये चर्चा असफल झाली म्हणून उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आपल्या 5 अधिकाऱयांना ‘सजा-ए-मौत’चे फर्मान सोडले. मार्चमध्ये या सर्वांना ठार मारण्यात आले. हा खुलासा द. कोरियाच्या ‘चोसन इल्बो’ या वृत्तपत्राने केला. या वृत्तानुसार, या पाचही अधिकाऱयांना फायरिंग स्क्वाडसमोर उभे करून गोळ्या घालून ठार करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
विशेष म्हणजे या पाचजणांमध्ये उ. कोरियाचा अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱयाचाही समावेश आहे. उ. कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांची ट्रम्प यांच्यासोबत मीटिंग विशेष प्रतिनिधी किम ह्योक चोल यांनीच ठरवली होती. त्यांनी आपल्या प्रमुखांना धोका दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि मार्च महिन्यात परराष्ट्र मंत्रालयातील 4 अधिकाऱयांसोबत चोल यांनाही फायरिंग स्क्वॉडद्वारे ठार करण्यात आले. हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आतापर्यंत अशा प्रकारे बऱयाच अधिकाऱयांना ठार केले आहे. त्यांनी आपले काका आणि राजकीय गुरू असलेल्या जाँग साँग थाएक यांनाही देशद्रोही आणि भ्रष्टाचारी ठरवून गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीलाही विष देऊन यमसदनी धाडले. आपल्या संरक्षण मंत्र्यालाही त्यांनी तोफेने उडवले होते.


























































