
देशाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचे सावट असतानाच दिलादायक बाब समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडत 1.03 लाख कोटींचे संकलन केले आहे. तब्बल तीन महिन्यानंतर जीएसटी संकलनाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधी जुलै महिन्यात 1.02 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.
गेल्या दोन महिन्यात जीएसटी संकलनातील वाढ नगण्य होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात संकलनात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थव्यवस्थेसाठी हे सकारात्मक संकेत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या अर्थव्यवस्थेनुसार जीएसटी संकलन उत्तम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर आठव्या वेळेला संकलन एक लाख कोटींवर पोहचले आहे. सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात केंद्राच्या जीएसटी संकलनातून सरकारला 19,592 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर राज्याच्या जीएसटीतून सरकारी खजिन्यात 27,144 कोटी जमा झाले आहेत. तर एकत्रित जीएसटीतून 49,028 रुपयांची कमाई झाली आहे. त्याचप्रमाणे जीएसटी उपकरातून 7,727 कोटींचा वसूली झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील हे संकलन आतापर्यंतचे तिसरे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. याआधी एप्रिल 2019 मध्ये जीएसटी संकलन 1.13 लाख कोटी होते. तर मार्च महिन्यात 1.06 लाख कोटी होते. ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटींचे संकलन झाले होते. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संकलन 97,637 कोटी होते. 2019-20 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर 4.5 टक्क्यांपर्यत घसरला आहे. त्यामुळे जीएसटी संकलनात झालेली वाढ दिलासा देणारी आहे.


























































