
>> अनघा सावंत
एखाद्या भौगोलिक प्रदेशात कसे कसे बदल होत गेले याचा अगदी मुळाशी जाऊन अभ्यास करणारे फार कमी लोक आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण यात दुर्मीळ आहे. मात्र साईलीने आपले कुतूहल जागृत ठेऊन यात आपली घोडदौड चालू ठेवली आहे.
साईली पलांडे-दातार… एक अष्टपैलू, धडाडीचे व्यक्तिमत्त्व. इतिहास संशोधक, पर्यावरण तज्ञ, पुरातत्त्व संशोधक आणि सेंद्रिय शेतकरी अशा करीअरच्या वेगळय़ा वाटेवर प्रवास करतानाच तिने संशोधक अभ्यासक, सल्लागार, स्तंभलेखक आणि हेरिटेज इंटरप्रिटर म्हणूनही विविध पदांवर काम केले आहे. निसर्ग आणि संस्कृती हे माझे महत्त्वाचे दुहेरी पदर असून त्याची सांगड घालत माझा अभ्यास निरंतर चालू राहील, असे सांगणारी पुण्याची साईली सध्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर’, इंग्लंड येथे मुख्य संशोधक म्हणून कार्यरत आहे.
साईलीने इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली असून इंडोलॉजी, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विविध अभ्यासक्रमांद्वारे इतिहास, कला, पुरातत्त्व आणि पर्यावरण या विषयांचेही प्रशिक्षण घेतले. दगड, लेणी, किल्ले, मंदिर, वाडे याविषयी तसेच आदिवासी, धनगर अशा विविध समाजांविषयी तिचा अभ्यास सुरू असून कोकणातील स्थानिक भाग, कोकणातील कातळशिल्प किंवा सडा या विषयावर साईली महत्त्वपूर्ण संशोधन करत आहे. याविषयी ती म्हणाली, ‘‘कोकणातील सडा किंवा कातळाला एक भौगोलिक वैशिष्टय़ आहे. बाहेरील लोक याला माळरान किंवा निरुपयोगी जमीन अशा नजरेने बघतात, पण असे नसून तिथल्या स्थानिक लोकांचे या गोष्टींशी नैसर्गिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोडले गेलेले आहेत. हे अनुबंध काय आहेत आणि ते कसे जोडले गेलेले आहेत यावर सध्या माझा अभ्यास सुरू आहे.’’
कुठलीही गोष्ट स्वीकारण्याआधी अथवा मोडीत काढण्याआधी त्याचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. कमी अभ्यासलेले जे विषय आहेत त्यांच्याबद्दल बोलले जावे, त्यांचे प्रश्न कळावेत किंवा जीर्णोद्धार होताना हरवतच चाललेल्या मूळ संकल्पना लोकांना कळाव्यात हा माझ्या अभ्यासाचा हेतू आहे, असे तिने सांगितले.
धार्मिक इतिहासाचा तिचा अभ्यास असून कला, मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राच्या आधारे तिने त्याचे वेगवेगळे पदर अभ्यासले आहेत. आजपर्यंत तिने विविध संस्थांच्या सहकार्याने नऊ संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे.
– भूतकाळातील आणि आताच्या मानवी जीवनाचा भाग असलेल्या, परंतु लिखित स्वरूपात नसलेल्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून पारंपरिक ज्ञान संकलनाचे मोलाचे कार्य साईली करत आहे. यासाठी निसर्ग, संस्कृती याविषयी मुळापासून प्रेम असलेल्या अगदी शेवटच्या पिढीशी संवाद साधत त्यांच्याकडून संबंधित माहिती घेऊन ती नवीन पिढीत रुजवण्याचे महत्त्वाचे काम ती करते. यापूर्वी तिने अजिंठा लेणींवर ‘आयआयटी, आयडीसी’मध्ये ‘प्रकल्प संशोधन वैज्ञानिक’ म्हणून तसेच पर्यटन विषयावरही काम केले आहे.
– एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा सर्वंकष अभ्यास करण्याकडे साईलीचा प्रचंड ओढा आहे. या आवडीतूनच तिने पुण्याचा प्रागैतिहासिक काळापासून ते आतापर्यंतचा इतिहास लिहिलेला असून या विषयावर तिचे पुस्तकाचे कामही चालू आहे.


























































