ऑनलाइन रमी खेळण्यासाठी बॅटऱ्या चोरणाऱ्याला अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन रमी खेळण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत, याकरिता सातारा शहर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी करणाऱया आरोपीस सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सातारा शहरातील एमआयडीसी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोड पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सातारा शहर पोलिसांनी रात्रग्रस्त आणि कसून पेट्रोलिंगचा धडाका लावला होता. सातारा शहरातून विविध ठिकाणी तसेच वळसे, भरतगाव, वाढे फाटा या ठिकाणी पोलिसांचे सातत्याने पेट्रोलिंग सुरू होते. या पेट्रोलिंगदरम्यान शहर पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आली. त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने 36 बॅटऱ्या चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. ऑनलाइन रमी खेळण्याची सवय लागल्याने आणि त्या खेळात पैसे लागत असल्याने बॅटरी चोरी करून त्याची विक्री करीत असल्याचे त्याने सांगितले. त्याने 36 बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केले असून, त्याच्याकडील चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी बॅटऱ्या चोरी झालेल्या वाहनधारकांनी सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अजय साबळे, विक्रम माने, विकास शिंदे, रोहित बाजारे, संतोष कचरे, सागर गायकवाड यांनी या कारवाईत भाग घेतला.