96 वर्षांत फुटबॉल विश्वाचे फक्त आठच राजे; फुटबॉलचे एव्हरेस्ट नवा गिर्यारोहक सर करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
only-8-champions-in-96-years-will-fifa-world-cup-2026-get-a-new-winner

फुटबॉलचे महायुद्ध सुरू होतेय. रणशिंग फुंकले गेलेय. फुटबॉलचा एव्हरेस्ट कोण सर करणार याची चर्चाही सुरू झालीय. पण फुटबॉल जगावेगळा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा दिवस तुमचा असला की तुम्ही दिग्गजांना हरवू शकता. टेनिसमध्ये एखादा खेळाडू दोन आठवडे स्वर्गीय खेळला की ग्रँडस्लॅम जिंकू शकतो. पण फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप? याचं गणितच सोप्पं नाही. गेल्या 96 वर्षांत 22 स्पर्धा झाल्या, पण फुटबॉलचे एव्हरेस्ट फक्त आठच संघांनी सर केलेय. यंदा तर चक्क 48 देश आहेत. या एव्हरेस्टवर नव्या गिर्यारोहकाने झेंडा फडकवला तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण स्पर्धाच इतकी तीव्र झाली आहे.

1930 मध्ये पहिला वर्ल्ड कप खेळला गेला आणि 2022 पर्यंत तब्बल 22 स्पर्धा झाल्या. जवळपास शतकभराच्या या प्रवासात जगात शेकडो देश फुटबॉल खेळले, लाखो खेळाडू मैदानावर उतरले, पण ट्रॉफी उचलण्याचा मान मिळाला तो फक्त आठ देशांनाच लाभलाय. ही आकडेवारीच सांगते की, वर्ल्ड कप जिंकणं म्हणजे हिमालयाच्या एव्हरेस्टवर ऑक्सिजनशिवाय चढाई करण्याइतपं अवघड काम आहे. आता अमेरिका, पॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक सुरू होतोय. तब्बल 48 संघ, 104 सामने आणि जगभरातील अब्जावधी नजरा, पण एक प्रश्न अजूनही हट्टाने उभा आहे की, इतिहासाचा दरवाजा नव्या विजेत्यासाठी उघडणार का? पण स्पर्धा सुरू झाली की सर्वात पहिले नाव येते ते ब्राझीलचे.

जर्मनी आणि इटली: शिस्त, परंपरा आणि जिंकण्याची सवय

ब्राझीलनंतर जर विश्वचषकाला सर्वाधिक सन्मानाने सलाम करणारे दोन देश असतील तर ते जर्मनी आणि इटली. चार-चार विश्वचषक त्यांच्या नावावर आहेत. जर्मनीची गोष्ट म्हणजे, फुटबॉलमधील जर्मन इंजिनच! भावना कमी आणि परिणाम जास्त. 1954, 1974, 1990 आणि 2014. प्रत्येक विजयामागे संघभावना, शिस्त आणि मानसिक ताकद. इटलीची कहाणी मात्र अधिक नाटय़मय आहे. 1934 आणि 1938 मध्ये सलग विजेतेपद. नंतर 1982 आणि 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन. पण फुटबॉल देवही कधी कधी विचित्र विनोद करतो. चार वेळा विश्वविजेता असलेला इटली सलग 2018, 2022 आणि आता 2026 विश्वचषकालाही पात्र ठरू शकला नाही! जणू एखादा माजी सम्राट स्वतःच्या राजवाडय़ाबाहेर उभा राहून आत जाण्याची परवानगी मागतोय. हे फुटबॉलचे संघर्ष दर्शवतो. इथे ज्याची किक चालते तोच धावतो. बाकीच्यांना किक बसते.

ब्राझील: फुटबॉलचा सम्राट अजूनही सिंहासनावर

पिवळा जर्सीधारी ब्राझील संघ पाच वेळा विश्वविजेता ठरलाय. 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002. हा फक्त विक्रम नाही; ही फुटबॉलची राजेशाही आहे. पेलेने या साम्राज्याचा पाया घातला. रोमारियोने त्यात सौंदर्य भरलं. रोनाल्डोने वेग दिला. रोनाल्डिन्होने जादू केली. नेमारने ग्लॅमर दिलं. पण गंमत बघा! 2002 नंतर ब्राझीलला ट्रॉफीचा स्पर्शही करता आलेला नाही. फुटबॉलचा सर्वात मोठा कलाकार गेली दोन दशके रंगमंचावर आहे, पण मुख्य पुरस्कार हातात आलेला नाही.

मेसीची अर्जेंटिना: इतिहास पुन्हा लिहिण्याची संधी

अर्जेंटिना म्हणजे भावना. 1978 मध्ये घरच्या मैदानावर पहिला मुकुट. 1986 मध्ये दिएगो मॅराडोनाने फुटबॉलला देवत्व दिलं. त्या विश्वचषकात त्याने केलेले दोन गोल आजही चर्चेचा विषय आहेत आणि मग आला 2022. लिओनेल मेस्सीने आयुष्यभर ज्यासाठी धाव घेतली, तो विश्वचषक अखेर त्याच्या हातात आला. फ्रान्सविरुद्धचा अंतिम सामना म्हणजे फुटबॉलचा महाभारतच होता. आता 2026 मध्ये अर्जेंटिना बचावात्मक विजेता म्हणून उतरणार आहे. मेस्सीसाठी हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे अर्जेंटिनाची प्रत्येक चाल, प्रत्येक पास आणि प्रत्येक गोल इतिहासाच्या नजरेखाली असेल.