
सामना प्रतिनिधी । नांदेड
अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधण्यासाठी आता एकच मार्ग शिल्लक आहे. यासाठी संसदेत कायदा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी शनिवारी येथे केले.
नवामोंढा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हुंकार सभेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नविनभाई ठक्कर, संत, महंतांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना विनायकराव देशपांडे म्हणाले की, राम मंदिराचा प्रश्न कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हा विषय आमच्यासाठी प्राधान्याचा नाही असे खेदजनक वक्तव्य केले. देशातील अनेक कमी महत्वाच्या आणि अनैतिक गोष्टींच्या बाबतीत मध्यरात्रीपर्यंत न्यायालय सुरु ठेवून निकाल दिले जातात. परंतु राम जन्मभूमीचा विषय न्यायालयाला महत्वाचा वाटत नाही, ही बाब कोट्यावधी राम भक्तांचा अपमान आहे, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, न्याय यंत्रणेवर आमचा विश्वास आहे, परंतु न्यायालयाने देखील आमच्या आस्थेचा आणि भावनांचा सन्मान केला पाहिजे. हुंकार सभेच्या माध्यमातून चेतावनी देण्यात येत आहे. आता सगळे मार्ग संपले. केवळ एकच मार्ग शिल्लक आहे तो म्हणजे संसदेत कायदा करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
राम जन्मभूमीचा प्रश्न म्हणजे हिंदू-मुस्लिमांचे भांडण नाही आणि मंदिर-मस्जिदीचा झगडाही नाही. हा विषय राष्ट्रीयता विरुध्द अराष्ट्रीयतेचा आहे. राष्ट्रीयत्वाचे मानबिंदू असलेल्या प्रभू रामचंद्रांचे चित्र हिंदुस्थानी घटनेत देखील प्रथम क्रमांकावर आहे. बाबरी मस्जिद हे गुलामीचे तर राममंदिर हे स्वतंत्रतेचे प्रतिक आहे, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.




























































