
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पाकिस्तानातील तुरुंगात 537 हिंदुस्थानींना डांबण्यात आले असून, त्यात 483 मच्छीमार आणि 54 नागरिक आहेत. तर हिंदुस्थानातील तुरुंगामध्ये 249 पाकिस्तानी आहेत.
2008मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये करार झाला होता. त्यानुसार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला तुरुंगात असलेल्या एकमेकांच्या देशातील नागरिकांची यादी देण्यात येते. पाकिस्तानच्या तुरुंगात डांबण्यात आलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची संख्या 537 असल्याचे जाहीर केले, पण ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. शिक्षा पूर्ण झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांची सुटका पाकने करावी, अशी मागणी हिंदुस्थानने केली आहे. तब्बल 483 हिंदुस्थानी मच्छिमार पाकच्या ताब्यात आहेत. मासेमारीवेळी सागरीहद्द लक्षात न आल्यामुळे नजरचुकीने हे मच्छीमार पाकच्या हद्दीत गेले. पण पाकिस्तानने मच्छीमारांना कैद केले. मानवतेच्या दृष्टीने त्यांची सुटका करण्याची मागणी सरकारने केली आहे. दरम्यान हिंदुस्थाननेही आपल्या तुरुंगात असलेल्या 249 पाकिस्तानी नागरिक आणि 98 मच्छीमारांची यादी दिली आहे. दरम्यान, आपल्या कैद्यांना भेटण्यासाठी हिंदुस्थानचे एक पथक पाकला जाणार असून, त्यात डॉक्टरांचाही समावेश असणार आहे.
अणुप्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण
31 डिसेंबर 1988मध्ये दोन्ही देशांमध्ये करारानुसार पाकिस्तानने मंगळवारी अणु प्रकल्पांची यादी हिंदुस्थानला दिली आहे. इस्लामाबादेतील हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयाकडे यादी सुपूर्द करण्यात आली. अशीच यादी हिंदुस्थानकडूनही पाकला दिली जाईल. दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला अणुप्रकल्पाच्या माहितीची देवाण-घेवाण होते.



























































