
यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी रावळपिंडीतील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 4 बाद 506 असा धावांचा डोंगर रचण्याचा विक्रम केला. कसोटीत असा पराक्रम साकारणारा इंग्लंड हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. इंग्लंडच्या झक क्राऊले (122), बेन डकेट (107), यष्टीरक्षक ओली पोप (108) आणि हॅरी ब्रूक (नाबाद 101) यांनी पाकिस्तानी गोलंदाजीचे पार वाभाडे काढीत मैदानात धावांचा पाऊस पाडला. इंग्लंडने आज कसोटीतील 112 वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
इंग्लंडच्या आजच्या हल्ल्याने पाकिस्तानी गोलंदाजांना भरदिवसाच आकाशात तारे दिसत होते. कारण टी -20चा तडका देत इंग्लंडच्या फलंदाजांनी 75 षटकांतच प्रति ओव्हर 7.74 धावांच्या सरासरीने पाच शतकी धावसंख्या उभारली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबर 1910 रोजी सिडनी कसोटीच्या पहिल्याच दिवशी 6 बाद 494 ही उच्चांकी धावसंख्या उभारली होती. इंग्लंडने आज तो विक्रम मोडीत काढत नवा विक्रम रचला.





























































