
शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व विकेंडमुळे सलग तीन दिवस सुट्टय़ा आल्याने सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा स्नान, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन घेण्यास भाविक गर्दी करत आहेत. तर दर्शनरांगदेखील सारडा भवनच्या पुढे गेली आहे. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग फुलून गेला आहे. भर उन्हातही भाविक पंढरीत दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दिसून येते.
कमी झालेले कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मंदिर पुन्हा दर्शनाकरिता बंद होऊ शकतात. हे लक्षात घेऊन सुट्टीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत आहेत. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच शनिवार व रविवार या विकेंडमुळे तीन दिवस सुट्टी राहिली आहे. त्यामुळे तीन दिवस भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे. भाविकांनी मुखदर्शन घेण्याबरोबरच रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेण्यास पसंती दिल्याने दर्शनरांग सारडापर्यंत गेली आहे.
राज्याच्या कानाकोपऱयातून तसेच विविध राज्यांमधूनही भाविक मोठय़ा संख्येने येत असल्याने त्यांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळे फुल्ल झाली आहेत. नगरपालिकेकडून पार्ंकगसेवा मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे खासगी वाहनानेदेखील भाविक मोठय़ा संख्येने येत आहेत. चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविक प्रथमतः चंद्रभागा स्नान करण्यास पसंती देत आहेत. तर, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पसंती दिली जात आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाविकदेखील दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येते.
मंदिर परिसरात शॅडोनेटची सावली
सलग तीन दिवस सुट्टय़ा आल्या आहेत. त्यामुळे लाखो भाविक पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असून, पंढरीनगरी गजबजली आहे. दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, पायांना चटके बसू नयेत, म्हणून मंदिर परिसरात शॅडोनेट उभारून सावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





























































