शिवसेनेची मदत आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही; पॅरा बॅडमिंटनपटू आरती पाटीलचा गौरव

दिव्यांग असूनही परिस्थितीवर मात करत, जपान येथे 2022 मध्ये पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया करवीर तालुक्यातील उचगाव येथील पॅरा बॅडमिंटनपटू आरती ज्ञानोबा पाटील हिला मुंबई येथे आयकर विभागात टॅक्स असिस्टंटपदी नोकरी मिळाली. तिच्या यशाचे कौतुक आज करवीर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्याला केलेली मदत आयुष्यात कधीच विसरू शकत नसल्याचे आरती पाटील हिने व्यक्त केली.

जन्मजातच एका हाताने दिव्यांग आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही जिद्दीच्या जोरावर आरतीने आजवर विविध खेळांत जिल्हा, राज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जपान येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत तिने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. मुंबई येथे आयकर विभागात टॅक्स असिस्टंटपदी नोकरी मिळाल्यानंतर करवीर शिवसेनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह शिवसैनिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. वेळोवेळी आर्थिक मदतीसह मानसिक आधार दिला. त्यामुळे शिवसेनेची मदत आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नसल्याची कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यात उचगाव येथे होतकरू खेळाडूंसाठी ऍकॅडमी सुरू करण्याचा विचारही तिने व्यक्त केला.

शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रमाणे शिवसैनिक यापुढेही नेहमीच समाजातील गरीब व होतकरूंच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहतील, याची ग्वाही दिली. तसेच आरती पाटील हिची आतापर्यंतची संघर्षमय कामगिरी इतरांनाही प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी दीपक रेडेकर, शरद माळी, दीपक पाटील, विक्रम चौगुले, ग्रा. पं. सदस्य विराग करी, अरविंद शिंदे, बाळासाहेब नलवडे, सागर पाटील, संतोष चौगुले, राम पाटील, आबा जाधव, अजित चव्हाण, बंडा पाटील, संदीप शेटके आदी उपस्थित होते.