दुचाकीवर रील बनवणे जीवावर बेतले, परभणीत नववीच्या विद्यार्थ्यांचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दुचाकीवर रील बनवणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. भरधाव दुचाकीला ऑटोने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार करून पुढे लातूरला हलवण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, योगानंद वैâलास घुगे, शंतनू कांचन सोनवणे, राहुल महादू तिथे हे नववीचे चार विद्यार्थी 26 जानेवारी रोजी झेंडावंदनासाठी कानसूर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे एकाच मोटारसायकलवर जात होते. पाथरी-सोनपेठ मार्गावर दुचाकी चालवत असतानाच हे विद्यार्थी मेला चित्रपटातील डर है तुझे किस बात का या गाण्यावर रील बनवत होते. रील बनवत असल्यामुळे त्यांचे दुचाकी चालवण्याकडे लक्षच नव्हते. त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणार्‍या भरधाव वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की गाडी चालवणार्‍या स्वप्निल चव्हाण याचा हात तुटून रस्त्यावर पडला. शंतनू सोनवणे याच्यासह मागे बसलेले योगानंद आणि राहुल हे गंभीर जखमी झाले. शाळेपासून अवघ्या एक किमी अंतरावर हा अपघात घडला.

अपघातानंतर चौघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच शंतनू सोनवणे याचा मृत्यू झाला तर स्वप्निल चव्हाण याचा आज सकाळी मृत्यू झाला. योगानंद घुगे आणि राहुल तिथे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूर येथे हलवण्यात आले आहे.

अपघातापूर्वीचा व्हीडिओ व्हायरल

दुचाकीवर बसून शाळेकडे निघतानाचा या चौघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दुचाकीवर बसलेले विद्यार्थी रील बनवताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गावावर दुःखाचा डोंगर

विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत असून, डाकू पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताच्या एक दिवस अगोदरच गावातीलच एका विद्यार्थ्याने अंबाजोगाई येथे आत्महत्या केली होती. हा विद्यार्थी शिकण्यासाठी तेथे गेला होता.