मराठी शाळांसाठी पालक एकवटणार!

318

मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन 14 आणि 15 डिसेंबरला  परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे.

 संमेलनाच्या पहिल्या दिवशी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता ‘मराठी शाळा जागर फेरी’ होईल. कामगार मैदान येथून सुरू होणाऱया या मराठी शाळांच्या जागरात पाचशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार असून दिग्दर्शक नागराज मंजुळे, शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत आणि  अभिनेत्री चिन्मयी सुमित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. गोखले एज्युकेशनचे कार्यवाह डॉ. एम. एस. गोसावी हे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. दुपारी 2 ते 4 या वेळेत पालक व शिक्षक आणि मराठीप्रेमी यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ‘मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार आहोत?’ या चर्चासत्रात अजय चौधरी, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, आशीष शेलार हे आमदार या चर्चेत सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱया दिवशी सकाळी 10.30 वाजता ‘मराठी शाळांमधील यशवंतांशी संवाद’, ‘मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व’ आणि ‘बाबा म्हणून माझी भूमिका, मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले’, ‘होय, आमच्या मुलांना आम्ही मराठी शाळेत घातले’ आदी विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र होतील. संमेलनाच्या नोंदणीसाठी संपर्क – 8104673453/8108862148.

मराठी शाळा टिकाव्यात आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने हे संमेलन भरविण्यात येते.संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या