परशुराम वाघमारेची कोठडी घेण्याचा अद्यापि विचार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, भाकप नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी श्रीराम सेनेचा कार्यकर्ता परशुराम वाघमारे याची कोठडी घेण्याचा अद्यापि विचार नाही, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) दिली. कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात वाघमारे हा प्रमुख आरोपी आहे. त्याचा पानसरे यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा संशय असल्याने वाघमारेचा ताबा महाराष्ट्र पोलीस घेणार असे वृत्त होते. त्या पार्श्वभूमीवर एसआयटीच्या एका अधिकाऱयाने वरील माहिती दिली.

हा अधिकारी पुढे म्हणाला की, वाघमारेची कोठडी आम्ही लगेच घेणार नाही. मात्र चौकशीच्या प्रक्रियेत आम्ही त्याची कोठडी घेऊ शकतो, असे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या प्रमुख अधिकाऱयाने एका वृत्तसंस्थेत सांगितले.

लंकेश हत्येप्रकरणी वाघमारेसह सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केलेली आहे, पण यापैकी एकाही आरापीची आम्ही कोठडी अद्यापि मागितली नाही अशी माहितीही या अधिकाऱयाने दिली. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एस. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर केल्याचा अहवाल रासायनिक प्रयोगशाळेने दिलेला आहे, परंतु हे शस्त्र अद्यापि पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी हल्ला झाला. २० फेब्रुवारी रोजी त्यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. या हत्या प्रकरणाचा छडा महाराष्ट्र पोलिसांची एसआयटी लावू शकलेले नाही.