Ratnagiri News – रत्नागिरी नगरपरिषदेत पक्षपातीपणा; शिवसेनेच्या नगरसेवकांची विकासकामे डावलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांचा निधी अडवण्याचे कुटील डाव सत्ताधारी महायुतीकडून खेळले जात आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अमित विलणकर आणि केतन शेट्ये यांनी पक्षपाती भूमिकेवर संताप व्यक्त केला.

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. यासभेच्या आयत्या वेळच्या विषयात शिवसेनेचे नगरसेवक अमित विलणकर आणि केतन शेट्ये यांनी विकासकामे करताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची कामे डावलली गेल्याचा आरोप केला. आम्हाला २० लाख रूपये निधीपर्यंत कामे द्या असे त्यांनी सांगितले.

आम्ही प्रभागातील जनतेच्या हिताची कामे सुचवली होती. मात्र, विकासकामे मंजूर करताना आमची सर्व कामे डावलली गेल्याचे आरोप नगरसेवक अमित विलणकर आणि केतन शेट्ये यांनी केला. त्याचबरोबर स्वस्तिक हॉस्पिटलच्या इथे सुरू असलेल्या बांधकामाचे पत्रे अद्यापही घेतले नाहीत. त्यामुळे संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केतन शेट्ये यांनी केली.

परकार हॉस्पिटलला आग लागली तेव्हा तात्काळ बचाव कार्य करून नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्राण वाचवले त्याबद्दल नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव सभेत घेण्यात आला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय परिसरात लावण्यात आलेल्या होर्डिंग मुळे एका विद्यार्थ्याचा अपघात झाला.आयत्या वेळी आलेल्या विषयानंतर तात्काळ सर्व होर्डिंग काढण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत.