प्राथमिक शिक्षकांचा पगार 1 तारखेलाच करा, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदोन्नत्या कराव्यात व पगार दरमहा 1 तारखेला खात्यावर जमा करावा, याकरिता चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस होता.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत मे महिन्याअखेर सहा शिक्षण विस्तार अधिकारी, 199 पैकी 178 केंद्रप्रमुख व 150 मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने भरण्याविषयी अनेक वेळा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापि त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. एकंदरीत प्रशासनाच्या पदोन्नत्या करण्याची मानसिकता नसून फक्त चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळवारपासून चक्री उपोषणाला सुरूवात करण्यात आली.

मागील दीड-दोन वर्षांपासून दरमहा 10, 15 किंवा 25 तारखेनंतरच शिक्षकांचा पगार होतो. यामुळे शिक्षकांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमा वेळेकर फेडता येत नसल्यामुळे त्यांना व्याज व दंड भरावे लागत आहे, याशिवाय त्यांचे क्रेडिट स्कोअर खराब होत असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पगार दर महिन्याला 1 तारखेलाच करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी या उपोषणाला भेट दिली. या आंदोलनात या गुरुसेवा परिवारात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (शिकाजीराक पाटील गट), सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट), सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समिती, सोलापूर जिल्हा पदवीधर शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा प्राथमिक एकल शिक्षक सेवा मंच, सोलापूर जिल्हा उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक पती-पत्नी सेवा संघ, जुनी पेन्शन हक्क शिक्षक संघ आदी शिक्षक संघटनांचा समावेश आहेत.