सिमकार्डचा झाला झोल, विकृत तरुणाने महिलांना अश्लील स्टीकर्स पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक सिमकार्ड विकत घेतल्यानंतर त्या नंबरवरून तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड केले, परंतु नेमके एका महिलेचे व्हॉट्सअॅप खाते सुरू झाले. संपर्क यादीत जास्त महिला तसेच महिलांचे ग्रुपदेखील असल्याचे लक्षात येताच त्या तरुणातला विकृतपणा चाळवला आणि त्याने सर्वांना अश्लील स्टीकर्स पाठवायला सुरुवात केली. अशा प्रकारे नको तो खोडसाळपणा करणाऱया विकृताला अखेर लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

यार अली मोहम्मद रफिक इद्रिसी (29) असे त्या विकृत तरुणाचे नाव असून तो मूळचा यूपीचा आहे. 24 एप्रिल रोजी त्याने एक सिमकार्ड खरेदी केले. त्या नंबरच्या आधारे त्याने मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड केले. यार अलीने जे सिमकार्ड घेतले ते आधी एका महिलेच्या नावावर होते. महिलेने त्या नंबरवर व्हॉट्सअॅप सुरू करून सिमचा वापर करणे बंद केले होते. बरेच दिवसअशीच परिस्थिती होती. परिणामी पंपनीकडून त्या क्रमांकाचे सिमकार्ड यार अलीला देण्यात आले होते. त्यामुळे यार अलीने त्या नंबरवरून व्हॉट्सअॅप डाऊनलोड  केला आणि त्यावर आलेल्या ओटीपीमुळे त्या महिलेचा व्हॉट्सअॅप सुरू झाला. परिणामी त्यावर त्या महिलेचे सर्व संपर्क आयते त्याच्याकडे आले. त्या यादीत महिलांचे नंबर अधिक होते. ते पाहून यार अलीने सर्व महिलांना अश्लील स्टीकर्स पाठविण्यास सुरुवात केली. शिवाय त्याने काही महिलांना व्हिडीओ कालदेखील करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच महिलेने लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रकाश पाटील, उपनिरीक्षक दिक्षा पारवे तसेच संतोष पवार, नीलेश झगडे या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता विकृत चाळे करणारा यार अली याला धारावी येथून पकडले.