आर्यन खानची तुरुंगवारी चोरांना फळली, गर्दीचा फायदा घेत 10 मोबाईल गुल केले

क्रूझ ड्रग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा असल्याने या प्रकरणाला भलतीच प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे आर्थर रोड तुरुंगाबाहेर माध्यमकर्मींसोबत ‘काय चाललंय’ हे बघायला येणाऱ्यांचीही गर्दी पाहायला मिळत होती.

शुक्रवार ते आर्यन खान तुरुंगातून बाहेर येईपर्यंत आर्थर रोड परिसरात किमान 10 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. जवळपास 22 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खान बाहेर आला होता. आर्थर रोड तुरुंगापासून शाहरूख खानचा बंगला मन्नतपर्यंत येईपर्यंत संपूर्ण प्रवासात त्याच्या गाडीच्या आजूबाजूला मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. खासकरून आर्थर रोड तुरुंगाबाहेर बरीच गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरांनी मोबाईल पळवले आहेत.

आर्यन खान प्रकरणी लोअर परळमध्ये सापडले सीसीटीव्ही फुटेज

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून नवनवीन बाबी उघड होत आहेत. एनसीबीबरोबरच मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांना लोअर परळमध्ये काही सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्या कारमधून एक महिला खाली उतरून किरण गोसावी याच्याशी गुफ्तगू करत असल्याचे त्यात दिसत आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने दिलेल्या जबाबाच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडीज कार स्पष्ट दिसत आहे. परंतु त्यातून खाली उतरलेली महिला ही पूजा आहे की अन्य कुणी याबद्दल अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पूजाच्या कारसोबत किरण गोसावीची एसयूव्ही कारही दिसत आहे. मर्सिडीजमधून उतरलेल्या महिलेने गोसावीसोबत काही बोलणे केल्यानंतर ती निघून गेली. त्यावेळी जवळच सॅम डिसोझाही होता. 3 ऑक्टोबरचे हे फुटेज आहे. डिसोझानेही प्रसारमाध्यमांसमोर त्याबद्दल माहिती दिली होती. गोसावीने आर्यनची अटक रोखण्यासाठी त्यावेळी 50 लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून शाहरुखकडून घेतल्याचे डिसोझा म्हणाला होता. त्यामुळे हे फुटेज गोसावीविरुद्धचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. त्याचप्रमाणे ददलानी हिचीही चौकशी केली जाऊ शकते.