मालदीवचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे हा देशाचा गौरव; पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । माले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या ‘निशान इज्जुद्दीन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांनी मोदींना हा सन्मान बहाल केला. आपल्याला हा सर्वोच्च सन्मान मिळणे हा हिंदुस्थानचा गौरव असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य या धोरणानुसार मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकरल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. मोदी रविवारी श्रीलंकेला भेट देणार आहेत.

कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक संकटात हिंदुस्थान मालदीवसोबत असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांच्या नागरिकांना विकास आणि स्थिरता हवी आहे. मालदीवमध्ये विकासाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. आपल्या द्विपक्षी सहकार्यामुळे भावी विकासाची दिशा ठरेल. दोन्ही देशाच्या लोकांचा संपर्क वाढविण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी परस्पर सहमती दर्शवली आहे,’ असेही मोदी म्हणाले. मोदी यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही केली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आली.