कळमनुरी तालुक्यात डिजीटल जुगारावर पोलिसांची धाड, सात जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कळमनुरी 

कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथे पैसे लावुन मोबाईलवर लुडो जुगार सुरू असतांना आखाडा बाळापुर पोलिसांनी धाड टाकुन सात जणांना   पकडले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ३० हजार रूपयांचे ६ मोबाईल व २ हजार ८०६ रूपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे ईद च्या बंदोबस्तासाठी वारंगाफाटा, डोंगरकडा भागात गस्तीवर होते. त्यावेळी चिंचोलकर यांना हदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचागावा नजीक शेख शब्बीर यांच्या हॉटेलच्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली मोबाईलवर लुडो गेम खेळत असल्याची खबर मिळाली. त्यावरून चिंचोलकर यांनी चुंचागावाकडे मोर्चा वळवत हा डिजीटल जुगार सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहुन काहीजण पळुन गेले. तर सात जणांना पोलिसांनी जागीच पकडले आहे.

दरम्यान, या प्रकरणी एपीआय चिंचोलकर यांनी संजय परसराम मोहीते, सुनिल दत्तराव कनके, गणपत सिताराम पवार, परसराम हरसिंग जाधव, पांडूरंग संभाजी चंद्रवंशी, सैय्यद आरेफ, रामराम शेषराव शेळके या सात जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. ही कार्यवाही बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सात जणांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.