
ठाणे पोलीस दलात शिपाईपदावर कार्यरत असणारे इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावचे सुपुत्र महेश मोरे (27) यांचे व्यायाम करताना नुकतेच निधन झाले. या घटनेने पोलीस दलासह डिकसळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलीस दलातील शीघ्र कृती दलात कार्यरत असताना दररोज सकाळी व्यायामासाठी जवान जात असतात. गुरुवारी (3) सकाळी 6 वाजता ठाणे येथील साकेत मैदानावर पोलीस शिपाई महेश मोरे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत व्यायाम करण्यासाठी गेले होते. याचवेळी व्यायाम करतेवेळी मोरे जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मोरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मोरे यांच्या मूळ डिकसळ गावी गुरुवारी (4) रात्री 8 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मोरे यांच्या पत्नी ठाणे वाहतूक विभागात पोलीस शिपाईपदावर कार्यरत आहेत, तर भाऊ सांगली पोलीस दलात असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन बहिणी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.



























































