कोंबडीच्या पिसावरून पोलिसांनी गाठला स्वर्ग

172

सामना प्रतिनिधी । टिटवाळा 

गुन्हेगार कितीही हुशार असला आणि एकही पुरावा मागे न ठेवण्याची त्याने कितीही खबरदारी घेतली तरी ‘कानून के लंबे हात’ त्याच्यापर्यंत पोहोचतातच. त्याच्यासाठी एखादा छोटासा सुगावाही पुरेसा असतो… मग घटनास्थळावर सापडलेले केस असो, नखे, रक्त किंवा एखादा कोंबडीचा पिस… होय, टिटवाळा पोलिसांनी चक्क कोंबडीच्या पिसावरून स्वर्ग गाठत महिलेच्या खुन्याला शोधून बेडय़ा ठोकल्या आहेत.

राया-खडवली मार्गावर २३जून २०१९ एका गोणीत अर्धवट जळालेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मोठय़ा चलाखीने तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या हातावर मेंहदी होती आणि कमरेला तावीत. यावरून ही महिला मुस्लिम किंवा बंगाली असावी, असा संशय पोलिसांना आला. आजूबाजूला आणखी काही सुगावा मिळतो का, हे शोधत असतानाच पोलिसांना ती ज्या गोणीत होती त्यामध्ये कोंबडीचे पिस दिसले. टिटवाळा परिसरात पश्चिम बंगालचे अनेक रहिवासी राहतात. त्यातील बहुतेक जण चिकन शॉप चालवतात. दरम्यान बनेली येथील चिकन विक्रेता आलम शेख याच्यावर संशय गेला. मोनी नावाची तरुणी आलमला नेहमी भेटायला यायची. काही दिवसांपासून मोनी आणि आलम गायब असल्याची खबर पोलिसांना मिळाली, असे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले.

पिस अन् पिस काढले…

खडवली येथे राहणारी मोनी आणि आलमचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून पैशांवरून दोघांमध्ये वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला की रोज शेकडो चिकनचा फडशा पाडणाऱ्या आलमने मोनीलाच संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याला त्याचा मित्र मनोउद्दीन शेख याची मदत घेतली. मोनीशी गोड बोलून तिला त्याने खडवलीला घरी बोलवले. तेथे आधी तिचा गळा दाबून खून केला. नंतर तिला गोणीत भरून राया-खडवली मार्गावरील मोरीखाली फेकून दिले. त्याआधी तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या गोणीला आग लावली, पण पावसामुळे गोणी अर्धवट जळाली आणि त्यात सापडलेल्या कोंबडीच्या पिसावरून पोलिसांनी या गुह्याची अक्षरशः पिस अन् पिस काढून आरोपीला जेरबंद केले.

आपली प्रतिक्रिया द्या